पुणे – भेसळयुक्त तूप करून बाजारात विक्री करणाऱ्या एकाला पाषाण परिसरातून अटक करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अशी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चतु:शृंगी पोलिसांनी छापा टाकून सातशे किलो भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. पाषाणमधील एकनाथनगर भागात एका पत्र्याच्या खोलीत हे काम केले जात होते. मात्र पोलीसांना याची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सांगसिंग तेजसिंग राजपूत (वय ३८, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. भेसळयुक्त तूप करून बाजारात विक्री केले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी पाषाणमधील एकनाथनगर भागात छापा टाकला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला दिली. सणासुदीच्या काळात अशा घटना पुन्हा एकदा समोर आल्याने सर्वसामान्य नागरिकांनी देखील सजग राहणे महत्त्वाचे आहे.