Damage caused by excessive rainfall : राज्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि अमरावती (Amravati) महसूल विभागात जून आणि जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या मदतीपोटी शेतकऱ्यांना 1 हजार 71 लाख 77 हजार वितरित करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकारने केलेल्या मदतीमुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि अमरावती (Amravati) या दोन्ही विभागांतील एकूण 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ज्यात, अमरावती विभागातील एकूण 7 लाख 63 हजार 23 शेतकऱ्यांना 557 कोटी 26 लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 6 लाख 46 हजार 295 शेतकऱ्यांना 435 कोटी 74 लाख रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत पीक नुकसानीसाठी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अनेक भागात बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक कृषी विभागसह महसूल प्रशासनाकडून पंचनामे करून अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता.
त्यानंतर आता या नुकसानीची भरपाईला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे देखील पाहणं महत्वाचे असणार आहे.