“मुझको भी तो लिफ्ट’ करा दे या गाण्यामुळे सर्वांनाच सुपरिचित झालेला बॉलीवूड सिंगर अदनान सामी हा आपल्या जबरदस्त वेटलॉसमुळेही सर्वत्र चर्चिला गेला. त्याच्या सुरेल आवाजाचे चाहते आजही सर्वत्र आहेत. पण सध्या तो गाण्यामुळे नव्हे तर एका ट्विप्पणीमुळे चर्चेत आला आहे.
अलीकडेच त्याने एक ट्विट करत बुरखा परिधान करण्याच्या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या ट्विटमध्ये अदनान म्हणतो की, मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ असणाऱ्या कुरानमध्ये महिलांना अशा प्रकारे झाकण्यात यावे असे म्हटलेले आहे? कुठेही नाही. इतकेच नव्हे तर इस्लाम धर्मियांसाठी सर्वांत पवित्र असणाऱ्या हज यात्रेदरम्यानही महिलांना अशा प्रकारे बुरखा परिधान करावयास सांगितले जात नाही.
अदनानच्या या सवाल करणाऱ्या ट्विटनंतर पाकिस्तानातील युजर्स चांगलेच भडकले आहेत. त्यांनी अदनानला ट्रोल केले असून “तुला इस्लाम वाचण्यासाठी वेळ असता तर तू अशा प्रकारची विधाने कधीच केली नसतीस’ असे ट्रोलर्सचे म्हणणे आहे.