राजगुरूनगर: खेड आळंदी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सभा चाकण येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शुक्रवारी दुपारी 2 वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी दिली.
या सभेला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
महाआघाडीचे उमेदवार मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होणार असून या सभेत ते काय बोलणार याकडे मतदारांचे लक्ष लागणार आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या आमदारकीच्या काळात दहा वर्षांतील योगदान आणि विकास यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे पारडे यावेळच्या निवडणुकीत जड आहे.
त्यामुळे पवार साहेबानी त्यांना पुन्हा संधी दिली असून शरद पवार उद्या खेड आळंदी विधानसभेतील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.