नवी दिल्ली – कॉंग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. त्यात 50 महिलांचा समावेश असून उन्नावमधील सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेची माता आणि गोंड जमातीच्या उंभा गावातील जमिनीसाठी लढा देणारे रामराज गोंड यांचा समावेश आहे.
या संदर्भात आता मोठी बातमी आली असून समाजवादी पक्षाने उन्नाव पीडितेसाठी मैदान रिकामं केलं आहे. अर्थात काँग्रेसच्या उमेदवार आशा सिंह यांच्याविरोधात समाजवादी पक्ष उमेदवार देणार नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द आशा सिंह यांनी या संदर्भात माहिती दिली.
काँग्रेसने गुरुवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उन्नावमधून आशा सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या संदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह यादव यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, आपल्याला अद्याप अशी काही सूचना मिळालेली नाही.
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने मनीषा दीपक यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना 30 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती. मात्र त्यांचा भाजपच्या उमेदवाराविरुद्ध पराभव झाला होता. 2021 मध्ये मनिषी यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर करोनाने त्यांचं निधन झालं होतं.