पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – औंध जिल्हा रुग्णालयातील अनागाेंदी कारभाराच्या पार्श्वभूमीवर तेथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांना सक्तीच्या वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांची जबाबदारी येरवडा मनोरुग्णालयातील उप अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहे.
याशिवाय एका कर्मचाऱ्याची बदली लाेहगाव उपजिल्हा रुग्णालयात केली असून, सहायक जमादाराची रवानगी त्याच्या मूळ सेवक या पदावर केली आहे. जिल्हा रुग्णालयात कामकाज बंद करून अन्य डाॅक्टरांसाेबत गप्पा मारत बसणे, चतुर्थश्रेणी कामगारांचे चुकीचे नियोजन, ओपीडीमध्ये न जाणे, रुग्ण न तपासणे, आणीबाणीवेळी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसणे,
इमर्जन्सीमध्ये रात्री प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातांना ससूनला पाठवणे, अस्वच्छतेकडे दुर्लक्ष आदी तक्रारींची शहानिशा केल्यावर पुणे परिमंडळचे आराेग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी डाॅ. डाेईफाेडे यांची बदली प्रस्तावित केली हाेती. तेव्हापासून डाॅ. डाेईफाेडे या वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत. आता त्यांना सक्तीच्या वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आहे.
डाॅ. डाेईफाेडे रजेवर गेल्यावर त्या पदाची अतिरिक्त जबाबदारी तेथील डाॅ. अंजली माेहाेळकर यांना दिली हाेती. परंतु, डाॅ. माेहाेळकर या काेणतीही पूर्वसूचना न किरकाेळ रजेचा अर्ज देऊन अनिश्चित काळासाठी रजेवर गेल्या. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे पद महत्वाचे असल्याने ते रिक्त ठेवता येत नाही, त्यामुळे या पदावर पुढील आदेश येईपर्यंत डाॅ. काेलाेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.