पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार २०२४ या वर्षी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना जाहीर झाला आहे. याची घोषणा राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर यांनी केली.
ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, ०६ एप्रिल रोजी सायं ५.३० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. रोख रुपये ११ हजार, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पती वंदन नगरकर यांनी मागील पुरस्कार सोहळ्यात पुढील पुरस्कार विशाखा सुभेदार यांना पुरस्कार देऊ, असे जाहीर केले होते. मागील वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेचा मान ठेवून सुभेदार यांना सन्मानित करत असल्याचे डॉ. वैजयंती यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राम नगरकर यांच्या ज्येष्ठ कन्या मंदा हेगडे या राम नगरकर यांचा लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या ‘रामनगरी’ कार्यक्रमाचा काही भाग सादर करतील. याबरोबरच पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे विशाखा सुभेदार यांची प्रकट मुलाखत घेतील.