पुणे {प्रभात वृत्तसेवा} – शहराचे नागरिकरण आणि विस्तार मोठा आहे. नागरी भागात थेट काम करण्याची संधी आपल्या अधिकारी म्हणून पहिल्यांदाच मिळाली आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन शहर विकासाला गती देण्यासाठी काम करू, अशी प्रतिक्रिया पुणे मनपाचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी येथे दिली.
राज्य शासनाने डाॅ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांची बदली केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी दुपारी त्यांनी डाॅ. खेमनार यांंच्याकडून पदभार स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यावेळी उपस्थित होते.
तर डाॅ. खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली असून, ते ३१ मार्च रोजी पदभार स्वीकारणार आहेत. पृथ्वीराज हे नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. तर, त्यापूर्वी त्यांनी सोलापूर आणि लातूर येथील जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.