मुंबई – ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याचा आरोप राज्याचे मंत्री अनिल परब यांनी केला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी सदावर्ते हेच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला.
एसटी आंदोलनातील आंदोलकांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऍड. गुणरत्न सदावर्ते, ऍड. जयश्री पाटील, पैसे जमा करणारा औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी ही तक्रार केली होती.
दरम्यान, आरोपींनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. त्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये जमा करण्यात आले असून ही रक्कम 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले. ही एवढी मोठी रक्कम गेली कुठे, कशासाठी वापरली, ही रक्कम शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनासाठी वापरली आहे का याचा तपास करायचा आहे असे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी काहीच दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1000 रुपये निधी गोळा केला असल्याची चर्चा आहे.