मुंबई – एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 6000 रुपयांचा सानुग्रह बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली.
मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचे चित्र आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील शासनाकडून घेण्यात आले आहेत. तसेच एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी यंदाच्या वर्षी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी 240 दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल.