मुंबई – अभिनेत्री सान्या मल्होत्राला ‘दंगल’ या चित्रपटामुळे मोठी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केले. आता लवकरच ती अभिनेता शाहरुख खानसोबत एका नव्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. नुकतेच तिने ही माहिती चाहत्यांना सांगितली आहे. सान्या मल्होत्रा शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. आता तिला शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.
सान्या शाहरूखसोबत ‘जवान’ या चित्रपटात दिसणार आहे. याबाबत सानिया म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे. जेव्हा मला ‘जवान’मध्ये आहे की नाही हे विचारले जात होते. तेव्हा मी यावर उत्तरे देणे टाळायचे. पण आता मी यावर बोलू शकते. शाहरुखसोबत काम करण्याची मला नेहमीच इच्छा होती. आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे. ही माझी ड्रीम फिल्म आहे. मी स्वत:ला शाहरुखसोबत पाहण्यासाठी जास्त प्रतिक्षा करू शकत नाही.’
सान्या मल्होत्रा सध्या तिच्या कॉमेडी ड्रामा ‘कटहल’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच्या प्रमोशन दरम्यान, सान्याने शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात काम करणार असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान, सान्याने ‘दंगल’ या चित्रपटात बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. या आधी सान्याने ‘लूडो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील सान्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय तिच्या ‘बधाई हो’ चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तिने अभिनेता आयुषमान खुरानासोबत काम केले होते.
‘जवान’ हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे.