बॉलीवूडसह सर्वत्र सध्या टॅटूचे फॅड जबरदस्त वाढले आहे. विशेषतः तरुणपिढी टॅटूवेडाने ग्रासली आहे. बहुतांश तरुण-तरुणी आपल्या जीवलगाचे नाव हातावर कोरून घेताना दिसतात. बॉलीवूड कलाकारांतही असाच प्रकार दिसतो. मध्यंतरी करिना कपूर, दीपिका पादुकोण यांचे टॅटू गाजलेही होते.
पण सिनेसृष्टीतील एका कलाकाराने आपल्या आईसाठी काढलेला टॅटू सध्या चर्चेत आहे. “लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून बॉलीवूडमधील कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आणि नागीन, मनमोहिनी यांसारख्या शोमधून झळकलेल्या अभिनेता जुबेर खानने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला दिले आहे.
याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने एक खास टॅटूही बनवला आहे. आपल्या उजव्या हातावर आतील बाजूस हा टॅटू काढला आहे. जुबेर म्हणतो की, आमच्या धर्मामध्ये टॅटू काढला जात नाही; पण तरीही मी असे केले आहे. कारण आज मी जो काही आहे तो माझ्या आईमुळे. तीच माझी खरी प्रेरणा आहे. हा टॅटू काही दिवसांपुरताच असणार आहे, असे सुरुवातीला त्याने आईला सांगितले होते; पण आता त्याने तो कायम ठेवण्याचे ठरवले आहे.