परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आणि महाराष्ट्रात सर्वांना पाणी फाऊंडेशनमुळे सुपरिचित असलेला आमीर खान सध्या आपल्या “लालसिंह चढ्ढा’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी आमीर खान अत्यंत कठोर डाएटचे इमाने इतबारे पालन करत आहे; परंतु अलीकडेच त्याने या डाएट प्लॅनचे उल्लंघन करत आपल्या जिभेचे चोचले पुरवले आहेत.
त्याचं झालं असं, आमीर खानला अर्ध्या रात्री काही तरी चमचमीत खाण्याची तल्लफ आली. मग काय त्याने तत्काळ आपल्या आईला झोपेतून उठवले आणि याविषयी सांगितले. आईनेही मग आपल्या लाडल्यासाठी अर्ध्या रात्री चिकन कबाब बनवले. या कबाबवर यथेच्छ ताव मारत दोघांनीही छान गप्पागोष्टी केल्या.
गेल्या पाच महिन्यांपासून आमीर खान फॉरेस्ट गम्प या 1994 मध्ये आलेल्या चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रयत्न करत आहे. या भूमिकेसाठी त्याला 20 किलो वजन कमी करायचे आहे. यासाठी तो वेगन डायट या सध्या बहुलोकप्रिय होत असलेल्या डाएट प्लॅनचा अवलंब करत आहे.
आमीर खान प्रथिनांचा भरणा असणारा आहार घेत आहे. यामध्ये उकडलेल्या भाज्या, डाळ आणि बहुधान्यमिश्रित रोटीचा समावेश आहे. इतके दिवस डाएट केल्यामुळेच असेल कदाचित आमीरला मध्यरात्री आलेली तल्लफ रोखता आली नाही. अतुल कुलकर्णीने लिहिलेल्या या चित्रपपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. पुढील वर्षीच्या नाताळाच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.