मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर आज विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर आणि वरुण शर्मासह काही कलाकार उपस्थित होते.
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र, नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. तसेच सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते.
प्राथमिक माहितीनुसार सुशांत काही महिन्यांपासून नैराश्यात होता. पाच दिवसांपूर्वी सुशांतच्या बहिणीने त्याच्याशी फोनवरून बोलणे केले होते. तेव्हा सुशांतने तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवस त्याची बहीण वांद्रे येथील त्याच्या घरी राहायला होती.
त्यानंतर सुशांत डिप्रेशनवरील औषधे घेत असल्याचे दिसून आले. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी रात्री सुशांतने दोन जणांना फोन केला होता. यात त्याची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि पवित्र रिश्तामधील अभिनेता महेश शेट्टी यांचा समावेश आहे. यामुळे या दोघांची पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे.