पिंपरी: करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. मात्र तरीही नागरिक काळजी घेताना दिसत नाही. बुधवारी (दि. 1) सकाळी पिंपरी भाजी मंडई येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. येथील गर्दीकडे पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने करोनाचा प्रसार वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त बुधवारी सकाळी दैनिक “प्रभात’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होताच महापालिकेने त्वरीत मोठ्या प्रमाणात कारवाई केली.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. फक्त किराणा माल, भाजीची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. ही खरेदी करतानाही तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र नागरिक सरकारने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
रविवार व सोमवारी पिंपरीतील भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस प्रशासनाने बंद केली होती. मंगळवारी अंशतः मंडईतील दुकाने सुरू असल्याने फारशी गर्दी नव्हती. मात्र बुधवारी सकाळी मात्र या मंडईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे करोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त होत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन या दोघांनी येथील मंडईतील गर्दीकडे दुर्लक्ष केल्याचे वृत्त “डिजिटल प्रभात’वर ऑनलाइन प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल महापालिका प्रशासनाने घेतली. दुपारी जेसीबीसह मोठा फौजफाटा पिंपरी मंडईत दाखल झाला. त्यापूर्वी येथील फेरीवाल्यांना हटविण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने येथील फेरीवाल्यांचे छपरांसह इतर साहित्य पूर्णपणे हटविले. यामुळे हा परिसर मोकळा करण्यात आला.