पुणे : पुणे पोलिसांनी कंटेनमेंट झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांवरुन संचार, पदपथावरुण वाहन चालवणे आदी कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी 278 अधिकारी आणि 1196 कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी आदेश पारित करत आहे. तर महापालिका पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संबंधीत परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करत आहे. कंटेनमेंट झोनचा परिसर पत्रे लावून सील करण्यात येत आहे. तर आतील लोकांच्या संचारावर काही बंधणे घालण्यात येत आहेत. मात्र तरीही काही नागरिक नियम पाळत नाहीत. अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोनमधील नागरिक पत्रे उचकटून इतर ठिकाणी जातात.
नागरिकांकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन होत आहे, तर दुसरीकडे करोणाच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कंटेनमेंट झोनमध्ये असलेले वाहनांचे निर्बध आणि मास्कच्या सक्तीचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
दरम्यान, शिथील केलेल्या निर्बंधांचा विनियोग नागरिकांच्या दैनंदिन गरजांची पुर्तता करण्यासाठी अपेक्षीत आहे. अद्याप कोरोनाचा धोका टळला नसून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे अत्यावश्यक आहे. यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व सार्वजनीक ठिकाणी दक्षता घ्यावी असे आवाहन सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी केले आहे.
- विनापरवाना संचार केलेल्या व्यक्तींवर कारवाई – 445
- विनापरवाना संचार करणाऱ्या व्यक्तींची जप्त केलेली वाहने – 85
- विना मास्क संचार करणाऱ्या व्यक्तींवर केलेली कारवाई – 536
- विना मास्क संचार करणाऱ्या व्यक्तींची जप्त केलेली वाहने – 38
- भादवी कलम 188 प्रमाणे केलेली कारवाई – 386
- ट्रिपल सीट वाहनचालकांवर केलेली कारवाई – 49
- सिग्नल जंपील – 236
- रॉग्न साईड – 96
- पदपथावर अतिक्रमण/गाड्या चालवणे – 36