पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी परवानगी नसतानाही ठिकठिकाणी सुरू असलेल्या चहा, वडापाव, पानांच्या टपऱ्यांवर महापालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरात सध्या हॉटेल, हातगाड्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या आशीर्वादाने शहरात सर्रास ठिकठिकाणी विनापरवाना टपऱ्या सुरू आहेत. या टपऱ्यांवर मोठी गर्दी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या ठिकाणी करोना संदर्भातील कोणतीही नियमावली पाळली जात नसल्याने करोनासाठी या टपऱ्या निमंत्रण ठरू लागल्या आहेत. अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईचे आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही अतिक्रमण विरोधी विभाग या कारवाईकडे डोळेझाक होत आहे. अशा अनधिकृत टपऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.