सोनई, (वार्ताहर) – सोनई पोलीस ठाण्याकडून सध्या विनानंबर प्लेट, कागदपत्रांची तपासणी, परवाना, ट्रिपल सीट अशा दुचाकीस्वारावर वाहतूक कर्मचाऱ्यांकडून कारवाई सुरू आहे. सोनई कॉलेज रोड परिसर, घोडेगाव रोड आणि चांद्यामध्ये कारवाई करत 40 दुचाकी स्वारावर केसेस करून त्यांच्याकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात विशेष करून कॉलेजमधील युवकांचा समावेश आहे.
कॉलेजमधील युवक ट्रिपल सीट बसून वेगाने दुचाकी चालवत त्यातून अपघात घडत असल्याने पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विना हेल्मेट, विना नंबर प्लेट, वेगाने गाडी चालवणे, कॉलेजमध्ये नसतानासुद्धा घिरट्या घालून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या युवकावर कारवाई होत असल्याने कॉलेजमधील युवकांनी याचा धक्का घेतला आहे.
सोनई कॉलेज रोड परिसरामध्ये विनानंबर प्लेटच्या गाडीवर युवक फिरत असल्याच्या तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या, अशा वाहनचालकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्यानेआता कॉलेज परिसरामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. पोलिसांनी चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय परिसरामध्ये कारवाई करत दंड वसूल केला.
यामध्ये घोडेगाव-चांद- सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अशीच कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. ही कारवाई सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे रवींद्र गर्जे, रामदास तमनर, सुनील पालवे आदी कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.