नगर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयीत आरोपीस जेरबंद केले आहे. त्याने विविध पोलीस ठाणे हद्दीत तब्बल २१ गंभीर गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तुषार हबाजी भोसले, (वय २३, रा, पिंपरखेड ता. आष्टी, जिल्हा बीड), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याची मोहनमाळ व पोत असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे अधीकचौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह राम चव्हाण, रा. आष्टी, जि. बीड) याच्या मदतीने चोरी केली असल्याचे उघड झाले असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या बाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी तुषार भोसले याने केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार संशयीत आरोपी भोसले यास शोध घेवून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.