पॉइंटर्स
16 लाख 60 हजार अर्ज
10 लाख 86 हजार जणांना कार्ड
2 लाख 71 हजार अर्ज प्रलंबित
पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यागांना युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड (यूडीआयडी) काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 16 लाख 60 हजार दिव्यांगांनी अर्ज केले असून, त्यापैकी 10 लाख 86 हजार जणांना हे कार्ड मिळाले आहे.
अजूनही 2 लाख 71 हजार दिव्यांगा कार्ड देण्याचे अर्ज प्रलंबित आहे. यूडीआयडी कार्डामुळे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती या शासन स्तरावर अधिसूचित होणार असून, केंद्र व राज्य सरकारतर्फे दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागासह भारतीय कृत्रिम अंग निर्माण महामंडळ, राष्ट्रीय दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ, भारतीय पुनर्वसन परिषद आदी संबंधित संस्थांतर्फे दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड अनिवार्य केले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या ओळख पडताळणीसाठी यूडीआयडी कार्ड हा एकमेव दस्तावेज ठरणार असून, दिव्यांगत्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे बाळगण्याची गरज भासणार नाही.
असे मिळेल ‘यूडीआयडी’ कार्ड
केंद्र सरकारच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. वैयक्तिक तपशील भरावेत. आधार क्रमांकाचाही उल्लेख करावा. दिव्यांगत्वाचा प्रकार निवडावा. बहुदिव्यांगत्व असल्यास नमूद करावे. आपल्या पत्त्याच्या जवळचे एक रुग्णालय निवडावे. दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र दिले जाते.
येथे होते तपासणी
यूडीआयडी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर पुणे जिल्ह्यात ससून रुग्णालय, औंध जिल्हा शासकीय रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, बारामती मेडिकल कॉलेज, पिंपरी येथील वायसीएम, मंचर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अर्जदार दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी होते. त्या आधारे दिव्यांगत्वाच्या टक्केवारीचा उल्लेख असलेले कार्ड व प्रमाणपत्र दिले जाते.