माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा आरोप
पिंपरी – पिंपरी कॅम्पातील आसवानी बंधू हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर एकूण 70 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी गुन्हेगारी वाढल्याची ओरड करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केला आहे. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपरी कॅम्पमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचे चार्ज शीट पाठवताना माजी उपमहापौर हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांच्यासह त्यांच्या घरातील 11 आणि अन्य 4 अशी 15 जणांची नावे नमूद केली. त्यामुळे आसवानी यांनी थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट घेत शहरात गुन्हेगारी वाढल्याची ओरड करण्यास सुरुवात केली. तसेच, भ्रष्टाचाराचे आरोप करीत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या बदलीची मागणी केली.
या विषयाबाबत माजी आमदार चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषद घेऊन आसवानी बंधूंच्या गुन्ह्याचा सर्व तपशील समोर ठेवला. ते म्हणाले की, कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस आपले काम चोख बजावत आहेत. त्यामुळे आसवानी बंधूंचा तीळपापड झाला आहे. पिंपरी कॅम्प परिसरात आसवानी बंधूंची दहशत आहे. त्यांचे अनेक अवैध धंदे कॅम्प परिसरात सुरू आहेत. या धंद्यांवर कारवाई केल्यास पोलिसांवर दबाव टाकला जातो. त्यांच्या नावाची ओरड केली जाते. त्यामुळे आसवानी बंधूंवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत कारवाई झाली पाहिजे.
आयुक्तांची बदली केल्यास आंदोलन
पोलीस आयुक्त बिष्णोई दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य करीत आहेत. त्यामुळे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या बदलीचा घाट घातल्याचा आरोप माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केला आहे. बिष्णोई यांची बदली झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री देशमुख यांची भेट घेणार आहे.