पुणे – कात्रजमधील संतोषनगर येथील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी भारती विद्यापीठ, सिंहगडरोड आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना फौलावर घेतले. यापुढे जर हद्दीत असे प्रकार घडले तर सोडणार नाही असा दम देखील त्यांनी भरला.
यावेळी, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, तिन्ही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तपासपथकांचे प्रमुख आणि अंमलदार उपस्थित होते. कात्रजमधील संतोषनगर घुंगरूवाला चाळ येथे बुधवारी दोन टोळक्यात झालेल्या वादातून कोयत्याने वार करून गोळी झाडण्यात आली होती.
याप्रकरणी दोन टोळक्याच्या विरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून काही आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्यातील काहींची दहाविची परिक्षा सुरु आहे. ही बाब पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घेतली.
त्यांनी दुसर्याच दिवशी भारती विद्यापीठ, सिंहगड रोड आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि तपास पथकाला आयुक्तालयात बोलावून घेतले होते. त्यांनी अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांच्या समोर तपास पथकांची हजेरी घेतली.
त्याच बरोबर सर्व्हिलन्सचे काम करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना सुद्धा फैलावर घेतले. यापुढे हद्दीत गोळीबाराचे प्रकार घडले तर गंभीर परिणाम होतील असा इशारा देखील दिला