पिंपरी – थरमॅक्स चौक निगडी येथून आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम चोरून नेणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते आरोपी पोलीस कोठडीत आहेत. कोठडीत असताना पोलिसांनी आपल्याकडे चौकशी करू नये, यासाठी एका आरोपीने पॅन्टच्या चेनमधील रनरने स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये घडली आहे. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर आणखी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय 20, रा. हडपसर, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विश्वास कदम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थरमॅक्स चौक येथील आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम आहे. 9 जून रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पाच चोरटे पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधला आणि एटीएम बाहेर ओढून गाडीत टाकून नेले.
या गुन्ह्याचा तपास करत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी शिताफीने अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी, शेऱ्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे (वय 23, रा. गाडीतळ हडपसर) यांना अटक केली. त्यांच्याकडून फोडलेले एटीएम, रोख रक्कम, पीकअप व्हॅन आणि अन्य मुद्देमाल जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींना निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे पोलिसांनी अजयसिंग या आरोपीला पिंपरी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले होते.
रविवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक कोकाटे त्याच्याकडे चौकशी करणार होते. पोलिसांनी आपल्याकडे चौकशी करू नये, यासाठी अजयसिंग याने त्याच्या पॅन्टच्या चेनचा रनर तोडला. रनरच्या सहाय्याने त्याने स्वतःच्या हातावर आणि मानेवर जखमा करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत अजयसिंग याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.