वाघोली -शिरसवडीत कंपनीला बेकायदा पाणीपुरवठा?’ या मथळ्याखाली दैनिक प्रभातमध्ये शनिवारी (दि. 13) वृत्त प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याने शिरसवडी (ता. हवेली) येथील प्रिकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीमा नदीवरून सुरू असणारा बेकादेशीर पाणीपुरवठा ग्रामपंचायतीने तातडीने बंद केला आहे. तर कंपनीच्या व्यवस्थापका विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
शिरसवाडी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी फक्त पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे भीमा नदीवरून होणारा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याबाबत माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे यांनी निवेदन दिले होते. ग्रामपंचायतीच्या परस्पर कंपनीचे व्यवस्थापक रंजन राऊत यांनी शनिवारी (दि. 20) बेकायदेशीरपणे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या पंप हाउसचे कुलूप तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच लता ज्ञानोबा गावडे, उपसरपंच रमेश कदम यांनी तक्रार दिली आहे.