जबलपूर – जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. पाठीमागून आलेल्या एका खासगी टॅंकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात सांगली जिल्ह्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याचा अगोदर पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली.
पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या पोपट यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते.
पोपट खोत हे 34 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. पोपट खोत यांचं पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणले जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.