नवी दिल्ली – बिहारमध्ये (Bihar) अलिकडेच करण्यात आलेल्या जात सर्वेक्षण अहवालात लोकांच्या आर्थिक स्थितीचीही पहाणी करण्यात आली. त्यात बिहारमधील तब्बल 95.49 टक्के लोकांकडे कोणतेही वाहन नाही, तर केवळ 3.8 टक्के लोकांकडे दुचाकी आणि 0.11 टक्के लोकांकडे मोटार कार असल्याचे दिसून आले आहे.
या अहवालात बिहारमधून होणाऱ्या स्थलांतरावर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की या राज्यातील 45.78 लाख लोक इतर राज्यांमध्ये काम करत आहेत, तर 2.17 लाख परदेशात आहेत. मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की राज्यातील 13.07 कोटी लोकांपैकी 12.48 कोटी लोकांकडे कोणतेही वाहन नाही.
फक्त 1.67 लाख लोकांकडे म्हणजे 0.13 टक्के लोकांकडे ट्रॅक्टर आहेत. मागास नसलेल्या म्हणजेच सर्वसाधारण श्रेणीतील 2.01 कोटी लोकांपैकी एकूण 11.99 लाख लोकांकडे दुचाकी आहेत.बिहारमध्ये 215 अनुसुचित जाती, जमाती, मागास वर्ग आणि अत्यंत मागास वर्गीय जातींच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी सादर करण्यात आला आहे. त्यातील माहितीतून बिहारच्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत विदारक असल्याचे समोर आले आहे.