मुंबई – विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने एक नवी योजना आणली असून आता अपघाती विमा एखाद्याला भेट म्हणूनही देता येणार आहे. शगुन-गिफ्ट ऍन इन्शुरन्स या अनोख्या वैयक्तिक अपघात विम्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीएआय) सॅंडबॉक्स नियमांतर्गत एसबीआय जनरलने या या विम्याची नोंदणी केली आहे.
या योजनेत वैयक्तिक अपघाताचा विमा समाविष्ट करण्यात आल्याने अपघाती मृत्यू तसेच अपंगत्व येणे यासारख्या घटना घडतात. या योजनेनुसार विमाधारकाला संपूर्ण आर्थिक संरक्षण मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा विमा तुम्ही कोणालाही भेट देऊ शकता. यासाठी विमा खरेदी करणारी व्यक्ती विमाधारकाच्या नात्यातच असणेदेखील आवश्यक नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
अनेक सोहळ्यांमध्ये अनेक जण भेटवस्तू किंवा पैसे भेट म्हणून देतात. या नव्या योजनेमुळे आता सर्वांना विमा एक भेटवस्तू स्वरूपात देता येणार आहे. या विमा योजनेचे हफ्ते देखील सर्वांना परवडतील असे ठेवण्यात आले आहेत.