बीड – केज तालुक्यातील बरड फाटा येथे एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (शुक्रवार) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
विक्रम आणवने (वय 55), दत्ता विक्रम आणवने (वय 15, दोघे रा. चाकरवाडी, ता. बीड) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, केज-मांजरसूंबा-पाटोदा रस्त्याचे काम सुरु आहे. चाकरवाडीकडे परतत असताना त्यांच्या रिक्षाला बरड फाट्यापासून बोरीच्या बागाजवळ औरंगाबाद-लातुर बसने जोराची धडक दिली.
यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात भूषण लहाने, गोविंद मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्त्याचे करणाऱ्या कंपनीने अनेक पुलाचे अर्धवट काम केले. तर दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात कपीलधारकडून मांजरसुंब्याच्या घाटमार्गाने बीडकडे येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला भीषण अपघात झाला होता. गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागेवर तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.