मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या, अशी खोचक टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. सध्याच्या राजकीय सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. या टीकेमुळे सोशल मीडियावर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले की, संजय राऊत इतके गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकी राहुद्या, त्यांना अगोदर कोणी तरी टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे द्या आणि उध्दव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या. बिचाऱ्यांना वाईट वाटले की त्यांना खोटारडा म्हटले. शाळेत असल्यासारखे वाटले त्यांना बघून, असे त्यांनी ट्वीट केले.
दरम्यान, एकिकडे राज्यात सत्ता संघर्षावरुन भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार वाद सुरु आहे. तर दुसरीकडे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे सोशल मीडियावर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.