हडपसर (विवेकानंद काटमोरे) –हडपसर उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने दुरूस्तीचे काम वेगाने करावे, अशा सूचना आमदार चेतन तुपे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेत दिल्या आहेत.
यानुसार आज उड्डाणपुलाच्या कामाने वेग घेतला असून तज्ज्ञांनी सुचविलेल्या दुरूस्त्या करण्यात येत आहेत. पूलाच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत पुलाच्या तीनही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ही संपूर्ण वाहतूक पुलाखालून वळविण्यात आली आहे. आवश्यक सेवेतील अवजड वाहनांना रात्री दहानंतर सकाळी सहापर्यंत या मार्गावरून प्रवास करता येईल. गाडीतळ येथील चक्राकार मार्गासह पूलाच्या परिसरातील सर्व बंद व पोलिसांनी जप्त केलेली वाहने माळवाडी येथे हलविण्यात येणार आहेत. गाडीतळ येथील कालव्यावरील बस थांबा हटवून पुढे गांधी चौकाजवळ येणार आहे. काही पंक्चर बंद करण्यात आले आहेत. कालव्यावरील रस्ते, कच्चे डीपी रस्ते वाहतुकीयोग्य करून त्यावरून वाहतूक होईल. हिंगणे मळा कालव्यावरून वाहतूक केली जाईल. वाहतूक नियंत्रणासाठी पीएमपीएलचे कर्मचारीही पोलिसांना मदत करणार आहेत.