नवी दिल्ली – देशात सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा राडा सुरु असल्याचे दिसत आहे. कारण कर्नाटकच्या कॉलेजमधील एका व्हिडीओने देशात नवीन वादळ निर्माण केले असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत एख तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना तेवढ्याच धाडसाने उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देताना पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओतील ज्या मुलीला तरुणांनी जय श्री रामच्या घोषणा देत हिजाबविरोधात निदर्शनं केली, त्या मुलीला आता पाच लाख रुपयांचं बक्षिस (5 Lakh Rs Reward) जाहीर करण्यात आलं आहे. जय श्री रामच्या घोषणांमधून कॉलेजात प्रवेश करत जाणारी ही मुलगीही अल्ला हूँ अकबरच्या घोषणा देताना दिसली होती. हात उंचावून तिनं आपला खाक्या घोषणेतून दाखवून दिला होता. आता या विद्यार्थीनीला एकानं चक्क पाच लाख रुपयांचं बक्षिस दिलंय. जमीयत उलेमा-ए-हिंद या संस्थेकडून हे बक्षिस जाहीर करण्यात आलंय.
जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या वतीनं मुस्कानला पाच लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय. तसंच तिच्या उज्ज्वल भविष्यसाठीही तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तिला प्रोत्साहित करण्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षिस देत असल्याचं या संघटनेनं म्हटलंय.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचे नाव मुस्कान आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबतच्या संभाषणादरम्यान मुस्कानने आपण असे का केले याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी बोलताना मुस्कान म्हणाली की, आपण कॉलेजमध्ये एका असाईनमेंटसाठी गेलो होतो. ते लोक आपल्याला कॉलेजमध्ये जाऊ देत नव्हते. बुरखा हटवल्यानंतरच आत जायचं असं ते सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामध्ये काही कॉलेजच्या आतील तर अनेक बाहेरचे होते.
या घटनेविषयी माहिती देताना पुढे मुस्कान म्हणाली, “जेव्हा त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा मी ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा दिली. आपले शिक्षक आणि प्राध्यापकांनी पाठिंबा दिल्याचेही तिने म्हटले आहे. बुरखा हटवला नाही तर आम्हीदेखील भगवा कपडा हटवणार नाही अशी धमकी ते देत होते असा आरोप तिने केला आहे. ते वारंवार मला घेरत होते असेही तिने सांगितले आहे.