पुणे – बटाट्याचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. उत्तरेकडील राज्यातून सध्या बाजारात बटाट्याची मोठी आवक होत आहे. किरकोळ बाजारात एक किलो बटाट्याची विक्री २५ ते ३० रुपयांना केली जात आहे. बटाट्यांची मुबलक आवक होत असल्याने वर्षभर बटाट्याचे भाव स्थिर राहणार आहेत.
नवीन लाल कांद्यापाठोपाठ बटाट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. उत्तरेकडील राज्यातून नवी मुंबईतील वाशी, पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डासह राज्यातील प्रमुख बाजार आवारात बटाट्याची आवक वाढली आहे. बटाट्याला फारशी मागणी नसल्याने भाव स्थिर आहेत. यापुढील काळात बटाट्याच्या मागणीत फारशी वाढ होणार नाही. उत्तरेकडील राज्यातून बटाट्याची मुबलक आवक होत असून, वर्षभर बटाट्याचे दर स्थिर राहणार आहेत, असे मार्केट यार्डातील बटाटा व्यापारी राजेंद्र तथा अप्पा कोरपे यांनी सांगितले.
सध्या बाजारात आग्रा, इंदौर, गुजरात, तसेच स्थानिक भागातून बटाट्याची आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागात बटाट्याची लागवड केली जाते. मात्र, या भागातील बटाट्याची लागवड संपूर्ण राज्याची गरज भागवू शकत नाही. उत्तरेकडील राज्यांत बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. उत्तरेकडील राज्यांतून संपूर्ण देशभरात बटाटा विक्रीस पाठविला जातो. सध्या बाजारात उत्तरेकडील राज्यांतून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून बटाट्याला फारशी मागणी नाही, असे कोरपे यांनी नमूद केले. घाऊक बाजारात १० किलाे बटाट्याला प्रतवारीनुसार १२० ते १८० रुपये असा भाव मिळाला आहे.
“मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आग्रा, इंदूर, गुजरात, तसेच स्थानिक भागातून दररोज साधारणपणे ५० ट्रकमधून बटाट्याची आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत बटाट्याची आवक मुबलक होत आहे.” – राजेंद्र कोरपे, बटाटा, व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड