पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या 76 व्या पुण्यस्मरणानिमित्त आणि प. पू. नारायणगिरी महाराजांच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या, दि. 9 रोजी पुसेगाव येथे ‘श्री सेवागिरी केसरी’ कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या आखाड्यात देशभरातील नामांकित मल्ल परस्परांशी भिडणार आहेत. तुल्यबळ लढती पाहण्याची पर्वणी कुस्तीशौकिनांना मिळणार आहे.
कुस्ती शौकिनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि दिल्लीचा मोनू खुराणा यांच्यात किताबासाठी मुख्य लढत होईल. विजेत्या मल्लास चांदीची गदा, रोख रक्कम आणि ‘श्री सेवागिरी केसरी’ किताब दिला जाईल.
या आखाड्यात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध हरियाणाचा दिनेश गुलिया, माउली कोकाटे विरुद्ध पंजाबचा राजू राईवाल, दादा शेळके विरुद्ध हरियाणाचा संदीप मान, कर्नाटकचा कार्तिक काटे विरुद्ध पोपट घोडके, संदीप मोटे विरुद्ध सुनील फडतरे, गणेश कुंकले विरुद्ध सुदर्शन कोतकर, कालिचरण सोलंकर विरुद्ध समीर शेख, भैरू माने विरुद्ध राहुल सूळ, सतपाल सोनटक्के विरुद्ध जयदीप पाटील, प्रशांत शिंदे विरुद्ध प्रतीक कुमार, सोन्या गोंगाणे विरुद्ध शुभम थोरात, या प्रमुख लढती होणार आहेत. याशिवाय 175 ते 200 कुस्त्या होणार आहेत.
या कुस्त्यांसाठी 51 रुपयांपासून एक लाख 51 हजार रुपये इनाम देण्यात येणार आहे. मैदानाभोवती सुसज्ज गॅलरीची आणि आखाड्यात ड्रोन कॅमेरे, दोन स्क्रीनची सोय करण्यात आली आहे. कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. कुस्ती मैदान यशस्वी होण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव हे परिश्रम घेत आहेत.
अव्वल दर्जाच्या मल्लांचा सहभाग
पुसेगावच्या आखाड्यात अव्वल दर्जाचे मल्ल सहभागी होणार आहेत. अतिशय तगड्या कुस्त्या जोडण्यात आल्या आहेत. रंगतदार, प्रेक्षणीय लढतींचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येईल.
– रणधीर जाधव, चेअरमन, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट.