पुणे – मार्केट यार्डात मागील 4 दिवसांपासून सिमला मिरची आणि टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. राज्याच्या विविध भागांतून ही आवक होत आहे. दिवाळीमुळे खानावळी बंद होत आहेत. तसेच घरगुती ग्राहकांकडून मागणी कमी आहे. कित्येक गाळ्यांवर मागणी अभावी माल शिल्लक राहत आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या घाऊक बाजारात सिमला मिरची आणि टोमॅटोला अनुक्रमे किलोस दर्जानुसार 6 ते 12 रुपये आणि 10 ते 12 रुपये भाव मिळत आहे. येथील तरकारी विभागात मंगळवारी (दि. 7) राज्यभरातून सिमला मिरचीची 50 ते 60 टन, तर पुणे विभागातून टोमॅटोची 100 ते 120 टनाची आवक झाली. सिमला मिरच्या आणि टोमॅटोला मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
सद्य:स्थितीत दिवाळी सणाचे वातावरण आहे. त्यामुळे फळभाज्यांना ग्राहकांकडून मागणी घटली आहे. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्याने ते आपापल्या गावाकडे गेले आहेत. तर शहरातील नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे खानावळी आणि हॉटेल चालकांकडूनही भाज्यांना होणारी मागणी घटली आहे. दिवाळी सण संपेपर्यंत ग्राहकांकडून भाज्यांना मागणी कमीच असणार आहे. त्यामुळे पुढील 8 ते 10 दिवस भाज्यांच्या मागणीत वाढ होणार नसल्याने भावही वाढणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला विक्रमी 200 रुपये किलो भाव मिळाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली. उत्पादन हाती आल्यावर चांगले भाव मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, आता टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांची निराशेचे वातावरण आहे.
“यंदा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे येत्या काळात भाज्यांना पाण्याची टंचाई जाणवणार आहे. आता बाजारात सिमला मिरच्या आणि टोमॅटोची आवक अधिक होत आहे. त्यामुळे भाव कमी झाले आहेत. मात्र, नव्या वर्षांत सिमला मिरच्या आणि टोमॅटोची आवक घटेल, त्यावेळी भावात वाढ येईल.” – महेश शिर्के, व्यापारी, मार्केट यार्ड