पिंपरी – दिवाळीनिमित्त ठेकेदार, नागरिक किंवा विविध संस्था अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देतात. मात्र, पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू अथवा देणगी स्वीकारु नये. तसे आढळून आल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मच्याऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.8) दिला आहे.
याबाबत आयुक्त सिंह यांनी परिपत्रक जारी केले आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर ठिकाणच्या कार्यालयात अथवा कार्यालयाच्या आवारात अशा देणग्या किंवा भेट वस्तू प्रवेशद्वारातून आत नेण्यास संबंधितांना मज्जाव करावा, असा आदेशही आयुक्त सिंह यांनी सुरक्षा विभागाला दिला आहे.
नागरिक, ठेकेदार अथवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांकडून भेट वस्तू अथवा देणग्या स्वीकारु नयेत. त्यांच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी अथवा भेट वस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हे परिपत्रक आणून द्यावे, अशा सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.