मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज ईडीने मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण अनिल देशमुख हे आजच्या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी आपल्या वकिलामार्फत ईडीकडे अर्ज करून त्यासाठी जादा वेळ मागून घेतली आहे.
71 वर्षीय अनिल देशमुख यांची आज खंडणी वसुलीच्या आरोपाखाली चौकशी करण्यात येणार होती. या प्रकरणात त्यांच्यावर ईडीने मनिलॉड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अनिल देशमुख यांनी ते मंत्री असताना आपल्याकडून शंभर कोटी रूपये वसुलीची मागणी केली होती असा आरोप एपीआय सचिन वाझे यांनी केला होता. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे. दुसऱ्या एका वृत्तानुसार अनिल देशमुख यांनी ईडीला आपली नेमकी कोणत्या मुद्द्यावर चौकशी केली जाणार आहे अशी विचारणा केली आहे.
त्यामुळेच आधी चौकशीचे मुद्दे निश्चीत झाल्याशिवाय आपण अशा प्रकारच्या चौकशीला हजर राहणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे संकेत दिले गेले आहेत असे मानले जात आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणे अपेक्षित होते.