नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात गरजेपेक्षा चारपट जादा ऑक्सिजनची मागणी नोंदवली असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एका उपगटाने आपल्या अहवालात काढला असल्याची बातमी काल भाजपच्या गोटातून प्रसिद्ध करण्यात आली होती. पण या उपगटाचे प्रमुख व दिल्लीच्या एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच हा दावा फेटाळून लावला आहे.
दिल्ली सरकारने चार पट जादा ऑक्सिजनची मागणी नोंदवलेली नाहीं असे त्यांनी स्पष्ट केले. हा दावा फाजील स्वरूपाचा आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे भाजपची मात्र चांगलीच गोची झाली आहे.
या कथित अहवालावरून भाजपच्या अनेक प्रवक्त्यांनी केजरीवाल सरकारवर टीका करून त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. दिल्लीच्या ऑक्सिजनचा विषय अंतरिम अहवालात आहे आपण अंतिम अहवाल येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे, असे डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
दिल्ली सरकारने चारपट जादा ऑक्सिजनची मागणी नोंदवली होती हे खरे आहे काय, असे विचारता ते म्हणाले की, आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल असे मला वाटत नाही. हा विषय सध्या सुप्रीम कोर्टात आहे आणि त्यांच्या अंतिम अहवालापर्यंत आपल्याला वाट पाहायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारकडून कालच भाजपचा हा दावा फेटाळून लावण्यात आला होता.