पैज लावली की काही माणसं अशक्य कामंही सहजपणे करून दाखवतात. पैज लावून पैसे उधळण्याची परंपरा तमाशाच्या फडापासून डान्सबारपर्यंत कायम राहिली. प्रतिष्ठेला आव्हान मिळालं की पेटून उठायचं, एवढंच ठाऊक असलेले अनेकजण पैजांच्या नादात बरबाद झाले. घरदार गेलं तरी बेहत्तर; पण प्रतिष्ठा सोडणार नाही, असा हेका अनेकांनी आजन्म मिरवला. कारण नसताना, नको तिथे, नको त्या प्रकारची स्पर्धा करण्याची प्रवृत्ती बाळगणारे आपल्याकडे वळणा-वळणावर भेटतात. दोन कर्मचारी ऑफिसमध्ये बढतीसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात आणि बहुतेक वेळा ती गुणात्मक न राहता प्रतिष्ठेची बनते, हे उघड गुपित आहे. प्रतिष्ठा दाखवायला कुणीच भेटलं नाही तर माणसं शेजाऱ्याशी ईर्षा करतात आणि प्रसंगी कर्ज काढून का होईना, त्याच्यापेक्षा महागड्या वस्तू घरात आणतात. गरज, ऐपत यापेक्षा प्रतिष्ठा महत्त्वाची ठरते.
पैजा लावणाऱ्यांची तर प्रतिष्ठेसंबंधी काही निराळीच कल्पना असते. सकारात्मक गोष्टीसाठी लागणाऱ्या पैजा नगण्यच; पण निरर्थक गोष्टींच्या पैजा मात्र आपल्याकडे अत्यंत प्रतिष्ठेच्या बनतात. लग्नाच्या जेवणात जिलेबी खाण्याची पैज असो, एकाच वेळी अनेक कप चहा पिण्याची किंवा जास्तीत जास्त सिगारेटी ओढण्याची पैज असो किंवा मद्याचे जास्तीत जास्त प्याले रिचवण्याची पैज असो, निरर्थक पैजांना आपल्याकडे तोटा नाही. सध्याच्या कसोटीच्या काळातसुद्धा जबाबदारीपेक्षा प्रतिष्ठा मोठी वाटणं हा याच मानसिकतेचा कळसाध्याय होय.
लॉकडाऊनच्या काळात मोबाइलवर लावण्या पाहून सामूहिक नृत्य करणाऱ्या आणि मोबाइलवरच पैसे उधळून त्याचा टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या काही तरुणांवर एका गावात पोलिसांनी कारवाई केली. पण मोबाइलचं खेळणं हाती गवसलेले बार्शीजवळच्या गावातले तरुण मात्र पैजेच्या नादात खूपच पुढं गेले. करोना संसर्गाच्या बाबतीत पुणे शहर रेड झोनमध्ये असलं तरी तिथले पोलीस खूपच कनवाळू. अशा संकटकाळीही मॉर्निंग वॉकचा शिरस्ता मोडू न देणाऱ्या “हेल्थ कॉन्शस’ लोकांना ते फार मोठी शिक्षा करत नाहीत. उलट, रस्त्यात योगासनं आणि सूर्यनमस्कार घालायला लावून शरीर सुदृढ राखण्यास मदतच करतात, हे पाहून या तरुणांनी आपल्या गावापासून पुण्याला जाऊन येण्याची मित्रांबरोबर पैज लावली.
जागोजागी नाकेबंदी, जिल्हाबंदी असल्यामुळे हे मुळीच शक्य नाही, असं मित्रांना वाटत होतं. पण पैज लावणाऱ्यांनी बाइकवरून प्रवास सुरू केला आणि ठिकठिकाणहून मित्रांना व्हिडिओ कॉल लावून आपण कुठंपर्यंत पोहोचलो आहोत, याची माहिती द्यायला सुरुवात केली. जागोजागी पोलिसांनी त्यांना अडवलंसुद्धा; पण “बहिणीला पैसे द्यायला निघालो आहोत,’ असं सांगून अनेक ठिकाणी त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. दरम्यान, या धाडसाची गावातच चर्चा सुरू झाली. स्थानिक पोलिसांनाही पैजेची माहिती मिळाली.
पोलीस अधिकाऱ्यांचे फोन या बाइकस्वारांना येऊ लागले. काही वेळा या तरुणांनी फोन उचललाच नाही आणि नंतर तो बंदच करून ठेवला. पोलिसांनी मग आपल्या पद्धतीनं तपास सुरू केला आणि पुण्याहून चाकणकडे निघालेल्या या बाइकस्वारांना ताब्यात घेतलं. बाइक जप्त केली आणि दोघांना त्यांच्या गावात आणलं. वैद्यकीय तपासणी करून त्यांना सध्या गावातल्याच शाळेत क्वारंटाइन करून ठेवलंय. प्रतिष्ठेसाठी ते पंधरा दिवस शाळेत राहतीलही; पण पैजेचा निवाडा कोण करणार?
– हिमांशू