म्हसवड (प्रतिनिधी) – करोनाच्या भीषण संकटाचा सामना करताना म्हसवड येथील माणदेशी फौंडेशन संचलित माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्र शिलेदाराची भुमिका पार पाडत असून या रेडिओ केंद्रावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
माणदेशी समुदायातील महिला व नागरिकांना करोनाविषयी माहिती देणारा कार्यक्रम मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या रेडिओ केंद्रावरून नियमित प्रसारित करण्यात येत आहे. “घरीच थांबा आणि कोरोना टाळा’, “मास्कचा वापर करा’, “हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा’, “एकमेकांमध्ये एक मीटरपेक्षा अधिक अंतर ठेवा, “खोकताना, शिंकताना रुमाल तोंडावर धरा’, “ताप, खोकला व घशात खवखव असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ जाऊन तपासणी करून घ्या’, अशा सूचना या रेडिओ केंद्रावरून सतत दिल्या जात आहेत.
करोनाबाबत जनजागृतीसाठी बसस्थानक परिसरात फ्लेक्स लावण्यात आला आहे. नगरपरिषद कार्यालयासमोर, बाजारपेठ, बसस्थानक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक या केंद्राच्यावतीने दाखविण्यात आले होते. या उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. भारत काकडे, डॉ. मयुरी शेळके, आरोग्यसेवक तायडे, माणदेशी रेडिओचे सचिन मेनकुदळे, अनुप गुरव, लता जाधव, रोहिणी गाडेकर यांचा कृतिशील सहभाग होता.
माणदेशी रेडिओवरील “फोन इन’ कार्यक्रमातून करोनाविषयी बोधप्रद चर्चा म्हसवडमधील आणि पुणे, मुंबई, कोल्हापूर, मिरज येथील डॉक्टरांबरोबर सुरू आहे. जनजागृती अधिक परिणामकारक होण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडलकर, नगर परिषदेचे सागर सरतापे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.