“छडी लागे छमछम’पासून शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास “रिस्टबॅंड’च्या जातीय रंगापर्यंत पोहोचला, हे ऐकून शिक्षणाने आपल्याला दिलं तरी काय, हा प्रश्न मेंदू पोखरू लागलाय. बाकावर शेजारी बसणाऱ्याची जात माहीतच नसण्याचा काळ गेला कुठे ? मुळात असा काळ होता, हे मान्य करण्याइतके आपण प्रामाणिक राहिलो आहोत का?
शाळेच्या भट्टीतून तावून-सुलाखून जगात आपण आपलं एक स्थान निर्माण करतो, ते शाळेनं दिलेल्या बळाच्या आणि संस्कारांच्या जीवावरच ना? पण त्यानंतर असंख्य प्रसंग असे येतात, जिथं जात विचारली, सांगितली आणि मिरवली जाते. मन केवळ सैरभैरच नव्हे तर भ्रष्ट होतं… कॉम्प्युटरच्या “करप्ट फाइल’सारखं..!
शाळेतला निरागसपणा औषधालाही शिल्लक राहू नये, इतके आपण बदलतो. याच निरागसपणामुळे आपण शाळेत प्रामाणिकपणे जात दूर करून माणूस जवळ केलेला असतो. एकमेकांच्या डब्यातलं खाताना, झुंडीनं उनाडक्या करताना, घाम निघेपर्यंत खेळताना जातीपातींचा विचार असतोच कुठे? भविष्यात तो विचार डोक्यात येईल, असंही त्या वयात कधी वाटलेलं नसतं.
कोविडच्या साथीमुळे शाळा दोन वर्षे बंद राहिल्या, तेव्हा एक शब्द सतत चर्चेत होता- सोशलायझेशन! शाळा हे केवळ शिकण्याचं ठिकाण नसून, मुलांचं सामाजिकीकरण तिथे होतं आणि म्हणून लवकरात लवकर शाळा सुरू केल्या पाहिजेत, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत होते. या “सोशलायझेशन’मध्ये सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया अपेक्षितच असते.
वय वाढल्यावर आणि अक्कल आली आहे, असं आपलं आपल्यालाच वाटू लागल्यावर आपण “करप्ट’ झालो खरे; पण किमान आपल्या आठवणींच्या बॅंकेत तरी शाळेतल्या जातिविरहित धम्माल मस्तीची श्रीशिल्लक राहिलीये का? या प्रश्नाचं उत्तर
स्वतःला प्रामाणिकपणे द्यायची वेळ आलीये, कारण जाती-धर्मातलं अंतर आता शाळेचा दरवाजा ठोठावतंय.
कर्नाटकातलं “हिजाब विरुद्ध स्कार्फ’ प्रकरण गाजल्यानंतर आता तमिळनाडूतलं “रिस्टबॅंड’ प्रकरण समोर आलंय. तिथली शाळकरी मुलं शाळेत जाताना आपापल्या जातीनुसार वेगवेगळ्या रंगांचे “रिस्टबॅंड’ घालून शाळेत जायला लागलीत. लाल, पिवळे, हिरवे, निळे, भगवे अशा वेगवेगळ्या रंगांचे बॅंड आणि त्या-त्या रंगांनुसार मुलांचे गट, त्यांच्यात वारंवार उफाळणारा संघर्ष… असं (वि)चित्र पाहायला मिळतंय. मुलांच्या या “विविधरंगी’ गटांमध्ये हिंसाचार होण्याच्या घटना वाढल्यात, हे शाळेचं प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही मान्य आहे.
सगळ्यात वाईट बाब अशी की, जातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्या वेगवेगळ्या नेत्यांचा पगडा या मुलांवर दिसून येतोय. जातीयवादी संघटना विद्यार्थ्यांना “आपल्या रंगाचा रिस्टबॅंड’ घालण्यासाठी गळ घालतायत. “त्यांनी बॅंड घातला म्हणून आपणही घालायचा’ ही प्रवृत्ती वाढतेय. या वातावरणात काही “शिकणं’ शक्य आहे? निरागस मुलांमध्ये जातीचं विष कालवण्याची चढाओढ आपल्याला कुठे नेईल?
शाळा मुलांच्या केवळ मनगटातच नव्हे तर मन आणि मेंदूतही ताकद भरते. परंतु मनगटात ताकद येण्यासाठी मन आणि मेंदू रिकामे असावे लागतात. त्यात जातिधर्माचा कडवा विचार पेरला गेला, तर “सोशलायझेशन’ शब्दाला काय अर्थ उरतो? कोविडमुळे शाळा बंद होत्या तेच बरं होतं की काय? जातीवरून एकमेकांची डोकी फोडण्याचं ट्रेनिंग शाळाबाह्य शक्ती मुलांना देत असतील, तर शाळा आणि पोलीस प्रशासनाने या विषवल्ली मुळासकट उपटून जाळल्या पाहिजेत.