लाओसमध्ये उजव्या गटाची क्रांती?
टोकियो, दि. 10 – लाओसचे संरक्षण मंत्री सिसूक नाचम पासाक हे लाओसमध्ये राज्यक्रांती करण्याचा कट रचित आहेत, असे पेकिंगच्या मिन्हा वृत्तसंस्थने जाहीर केले आहे. नाचम पासाक हे उजव्या गटाचे आहेत. पाथेर लाओ गटाचे वृत्तानुसार या बंडाला थायलंडचा पाठिंबा असावा.
हेरगिरी करणारे दोन अमेरिकेचे उपग्रह
केपकानाव्हेराल – अमेरिकन संरक्षण खात्याने दोन उपग्रह अंतराळात सोडले आहे. हे दोन उपग्रह सर्व जगातील गुप्त माहिती अमेरिकन संरक्षण खात्याला पुरविणार आहेत. एक उपग्रह हिंदी महासागरावरून व दुसरा पॅसिफिक महासागरावरून सोडण्यात आला आहे.
विजेवर चालणारा टाइपरायटर इंदिराजींना सादर
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रात तयार झालेला भारताचा पहिला विजेचा टाइपरायटर दळणवळणमंत्री शंकरदयाळ शर्मा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना सादर केला. हा टाइपरायटर मद्रास येथील हिंदुस्थान टेलिप्रिंटर्स या कंपनीने तयार केला आहे. इंदिरा गांधींनी या कंपनीचे अभिनंदन केले आहे. स्वयंपूर्णतेच्या मार्गावर हे एक नवे पाऊल आहे, असे त्या म्हणाल्या.
मिसाचा योग्य वापर करा
नवी दिल्ली – आपापल्या राज्यांमध्ये अंतर्गत सुरक्षा कायद्याचा वापर करताना योग्य तो विचार करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री ब्रह्मानंद रेड्डी यांनी राज्यांना केले.