अबाऊट टर्न : शस्त्र

हिमांशू

जगात प्राणिप्रेमी पावला पावलाला भेटतात. आम्हालाही अनेक प्राणी आवडतात; परंतु ज्यांना साप, विशेषतः विषारी साप आवडतात त्यांच्याविषयी आम्हाला अतोनात आदर आहे. कुणाच्याही घरात, अंगणात साप निघाला तर तो पकडून दूर सोडून देण्यासाठी एका फोन कॉलवर धावत जाणारे सर्पमित्र आम्हाला खूपच भावतात. शिवाय आम्ही सर्पवर्गीय नसताना त्यातले काही सर्पमित्र आमचेही मित्र असल्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी अभिमानही वाटतो. वनकायद्याच्या धास्तीमुळे आता गारुडी दिसत नाहीत.

बत्तीस शिराळ्याचा नागपंचमी उत्सवही होत नाही. लहानपणी या उत्सवात अगदी पोरं-सोरंही नाग-सापांना अंगाखांद्यावर खेळवताना आम्ही पाहिली आहेत. असे खेळ करायला दगडाचंच काळीज हवं. नाग आणि अन्य विषारी सापांचे “खेळ’ बंद झाले असले तरी काहीजण त्यांचा भलत्याच “खेळा’साठी वापर करत असल्याचं पुढे आलं तेव्हा धक्‍काच बसला.

प्राचीन काळातल्या युद्धांत शत्रूवर नाग-अस्त्र सोडलं जायचं, असं कथा-कहाण्यांमधून आपण ऐकतो. धनुष्यातून सोडलेल्या एका विशिष्ट बाणातून अचानक असंख्य नाग-साप बाहेर यायचे आणि शत्रूसेनेतील सैनिकांना सळो की पळो करून सोडायचे. हे महासंहारक अस्त्र आजच्या काळात कुणी वापरत असेल, यावर सांगूनही विश्‍वास बसणार नाही. परंतु अशा घटना घडतात आणि विषारी सापांचा वापर एखाद्याच्या खुनासाठी करण्याचा “ट्रेंड’च आहे, असं प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात, तेव्हा प्रकरणातलं गांभीर्य वाढणं स्वाभाविक आहे.

अशाच एका प्रकरणात सहभागी असलेल्या तरुणाला जामीन नाकारताना सर्वोच्च न्यायालयानं “”जामीन मिळवण्याची तुमची पात्रता नाही,” अशी कठोर टिप्पणी नुकतीच केली. या प्रकरणात एका सुनेनं सासूचा खून करण्यासाठी विषारी सापाचा उपयोग केल्याचा संशय आहे. सुनेनं त्यासाठी तिच्या मित्राची आणि त्यानं त्याच्या मित्राची मदत घेतली, असा आरोप आहे.

संबंधित महिलेच्या विवाहबाह्य संबंधांवर आक्षेप घेणाऱ्या सासूचा काटा काढण्यासाठी हा सगळा खटाटोप झाला म्हणे! हे एकंदर कथानकच भयावह आहे. सुनेचा मित्र आणि त्याचा मित्र असे दोघे एका गारुड्याकडे गेले. त्याच्याकडून एक विषारी साप 10 हजार रुपयांना विकत घेतला. तो सुनेनं सासूविरुद्ध “शस्त्र’ म्हणून वापरला. तिनं सासूच्या खोलीतल्या एका बॅगेत साप असलेली पिशवी ठेवली. सकाळी सासू मृतावस्थेत आढळली.

सामान्य सर्पदंश म्हणून सुरुवातीला या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं गेलं. परंतु महिलेच्या सासऱ्याने संशय व्यक्‍त केल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, तेव्हा घटनेच्या एकाच दिवसात महिला आणि तिचा मित्र यांच्यात 100 पेक्षा जास्त वेळा फोनवरून बोलणं झाल्याचं लक्षात आलं. तपास करत-करत पोलीस त्या गारुड्यापर्यंत पोहोचले. तोच या प्रकरणात साक्षीदार बनला आणि आपल्याकडून साप विकत घेतल्याची कबुलीही दिली.

एखाद्याचा खरोखर सर्पदंशानं मृत्यू झाला तरी मनात संशय निर्माण व्हावा, असं हे कथानक. पोस्ट मॉर्टेम करा किंवा आणखी काही करा; मृत्यू सर्पदंशानं झाल्याचंच निष्पन्न होईल आणि खुनाचा संशयही कुणाला येणार नाही, अशी व्यूहरचना करणाऱ्यांची तुलना करायला कोणत्याही कथा-कादंबरीत एकही पात्र सापडणार नाही, हे जाणवून आम्ही हादरलो. पण त्याहून अधिक हादरा बसला, तो न्यायमूर्तींच्या टिप्पणीनं – “”खुनासाठी विषारी सापाचा वापर करणं राजस्थानात सामान्य आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.