पुणे : ‘पीएमपीएमएल’कडून नवे पासेस दर लागू

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाने संचालक मंडळाच्या बैठकीत दैनिक आणि मासिक पासेसच्या दरात बदल केले होते. मात्र, या दरांची अंमलबजावणी रखडली होती. अखेरीस महिनाभरानंतर नवीन पासेस दर लागू करण्यात आले आहेत.

मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही हद्दीत पासेसचे दर वेगळे असल्याने पीएमपीने बसेसमध्ये हद्दीबाबतची माहिती आणि पासेसच दरफलक लावणे आवश्‍यक असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्‍त केले जात आहे.

पीएमपीने सप्टेंबर महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित दरांना मान्यता दिली होती. याची अंमलबजावणी दि. 7 सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याची घोषणा देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. मात्र, पासेसची छपाई न झाल्याने हे दर लागू होण्यास सुमारे एक महिन्याचा कालावधी लागला असून या घोषणेनंतर महिनाभराने नवीन दर लागू केले आहेत.

एका मनपा हद्दीत प्रवासासाठी दैनिक पास 40 रुपये आणि मासिक पास 900 रुपये, तर दोन्ही मनपा हद्दीत प्रवास करण्यासाठी दैनिक पास 50 रुपये आणि मासिक पास 1200 रुपये या प्रमाणे बस प्रवास पासेसची कार्यान्वित केली आहे.

ई तिकिट मशिनमधून प्रवाशांना पास देताना पूर्वीप्रमाणे दैनिक पासेस वितरीत करण्यात येणार आहेत. यासह सध्याचे 70 रुपयांचे दैनिक पास आणि 40 रुपयांचे ज्येष्ठ नागरिक दैनिक पासेसच्या दरात बदल केला नसल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

विविध दरांचे पासेस घेण्यासाठी प्रवाशांना हद्द समजणे आवश्‍यक आहे. अनेक वाहकांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडची हद्द कोठे सुरू होते आणि संपते याची माहिती नसते. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद उद्भवण्याची शक्‍यता आहे. पीएमपीने हद्दीचे फलक बसमध्ये लावणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रवाशांना केव्हा 40, 50 किंवा 70 रुपयांचा पास काढायचा आहे, हे समजणार नाही. अन्यथा सर्व हद्दीत एकच दर लागू करणे अपेक्षित आहे.
– संजय शितोळे,
सचिव, पीएमपी प्रवासी मंच

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.