– हिमांशू
पेशंटचे नातेवाईक आयसीयूच्या बाहेर बिनघोर बसलेले असतात, कारण दुखणं जीवावरचं नाही हे त्यांना कळलेलं असतं. अचानक आतून निरोप येतो, “पेशंट दगावला!’ नातेवाइकांना वाईट वाटतं, दुःख होतं; पण पहिली प्रतिक्रिया असते धक्का बसणं! “असं कसं झालं?’ हा प्रश्न नातेवाइकांच्या चेहऱ्यावर सर्वप्रथम उमटतो. काही वेळानं डिटेल्स कळतात; कॉम्प्लिकेशन्स लक्षात येतात आणि नातेवाईक कन्व्हिन्स होतात. अशा अनेक घटना आपल्या नात्यागोत्याच्या, ओळखीपाळखीच्या व्यक्तींच्या घरात घडलेल्या असतात.
आपल्याही घरात अशी एखादी घटना घडलेली असते. परंतु काही घटना अशा असतात, जिथं पेशंटचे नातेवाईक कधीच “कन्व्हिन्स’ होत नाहीत. काही वेळा तर हॉस्पिटलमध्येच नातेवाइकांची संतप्त प्रतिक्रिया उमटते, राडा होतो; पण बहुतांश घटनांमध्ये पेशंटचे नातेवाइक प्रश्नार्थक चेहरा घेऊन गुपचूप घरी जातात. पुढे अनेक महिने हे प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावरून हटत नाही. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी हीसुद्धा आपल्यासारखी माणसंच असतात; पण त्यांना चूक करण्याची संधी नसते.
चुकीचा परिणाम मृत्यू! पण हा मृत्यू “घडवून आणलेला’ असेल तर..? नर्सचा वेश धारण करून मृत्यू रुग्णालयातच फिरत असेल तर..? अमेरिकेत सध्या अशाच एका नर्सने घडवलेल्या हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. हीथर प्रेस्डी नावाच्या या नर्सने 17 रुग्णांना इन्सुलिनचा अतिरिक्त डोस देऊन ठार मारल्याचा आरोप आहे. साडेतीन वर्षांत तिने पाच हॉस्पिटल्समध्ये हा खेळ खेळल्याचं सांगितलं जातंय.
खेळ नाही तर दुसरं काय म्हणायचं याला? तिने हे खून का केले, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
परंतु 2018 मध्ये नर्स म्हणून काम सुरू करणाऱ्या हीथर प्रेस्टीने 2023 पर्यंत 11 हॉस्पिटल्समध्ये “सेवा’ बजावली, याचा अर्थ तिचं कुणाशी पटत नसावं. मानसिक असंतुलनाची समस्या असावी, असं दिसतं. तिने मारलेल्यांपैकी सर्वांत लहान रुग्ण 43 वर्षांचा होता तर सर्वांत वयस्कर रुग्ण 104 वर्षांचा होता. ज्यांना डायबेटिस नाही, अशा रुग्णांनाही आपण इन्सुलिन दिल्याचं तिनं पोलिसांसमोर कबूल केलंय. हीथरची ही थ्रिलर कहाणी ऐकल्यावर अनेकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा “दि गुड नर्स’ चित्रपट आठवला असेल.
चार्ल्स कुलेन नावाच्या पुरुष नर्सने केलेल्या हत्याकांडाची कहाणी चित्रपटात होती. 29 जणांचा खून शाबीत झाला; पण त्याने मारलेल्या लोकांची संख्या वेगवेगळी सांगितली जाते. कुणाच्या मते 300 तर कुणी म्हणतं 400 लोकांना त्याने मारलं. सध्या न्यू जर्सीच्या तुरुंगात असलेल्या चार्ल्सला खून करण्याचं कारण जेव्हा विचारलं, तेव्हा तो म्हणाला होता, “कुणी मला रोखलंच नाही.’ यावरून अर्थातच त्याचं मानसिक असंतुलन लक्षात येतं.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने जुलैमध्ये रेल्वेच्या तीन डब्यांमध्ये फिरून उपनिरीक्षकासह चौघांना गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यात तो जे काही बोलला, त्यातून त्याची मनःस्थिती लक्षात येत होती. माणसं मारण्याचं हे मानसिक कारण अत्यंत खतरनाक आहे. आपल्याही आसपास अशी काही “असंतुलित’ माणसं फिरत असण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन कुणाचंही, कधीही ढळू शकतं. अलीकडे वाढत चाललेल्या या “मॅडनेस’ची कारणं शोधली नाहीत, तर अवघड आहे.