– हिमांशू
दृष्टीआडच्या सृष्टीचं आकर्षण आपल्याला पूर्वीपासूनच होतं आणि जोपर्यंत जिज्ञासा जागृत आहे तोपर्यंत राहणार. अज्ञात, गूढ गोष्टी दिसल्या, ऐकू आल्या की आपण त्याचे अर्थ आपापल्या परीनं लावतो. काहींना तो चमत्कार वाटतो आणि नमस्कारासाठी त्यांचे हात जोडले जातात. काहींना खोलात जाऊन शोध घ्यावासा वाटतो आणि ते झपाटल्यासारखं वास्तव शोधू लागतात. अन्आयडेन्टिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (यूएफओ) अर्थात उडत्या तबकड्यांचं गूढ 1947 पासूनच संपूर्ण मानवजात शोधतेय.
कुण्या एका अमेरिकी पायलटला विमान चालवत असताना अशा तबकड्या सर्वप्रथम दिसल्या. नंतर कुणालातरी जमिनीवर उतरताना दिसल्या आणि नंतर त्याजागी जाऊन पाहिलं तर काही अवशेष सापडले. त्या उडत्या तबकड्या होत्या, असं आधी अधिकृतपणे जाहीर केलं गेलं आणि दुसऱ्याच दिवशी ते अवशेष हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सोडलेल्या बलूनचे होते, असं जाहीर झालं.
अमेरिकी लष्कराला परग्रहावरचा माणूस अर्थात एलियन सापडलाय आणि त्याला अज्ञातस्थळी ठेवलं गेलंय, अशी चर्चा फेक न्यूजचा जमाना सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली होती. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. कोणत्या तरी दूरच्या ग्रहावर मानवसदृश लोक राहतात, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा अधिक प्रगत तंत्र आहे आणि हे लोक यानातून पृथ्वीवरच्या माणसाचा अभ्यास करायला येतात, अशा कहाण्या पाऊणशे वर्षांपासून सांगितल्या-ऐकल्या जाताहेत. गुरुवारी या गूढ घटनाक्रमातलं महत्त्वाचं पान मेक्सिकोच्या संसदेत उघडलं आणि वाचलं गेलं.
माणसाच्या आकाराचे सुमारे हजार वर्षांपूर्वीचे दोन सांगाडे लाकडी खोक्यांमधून मेक्सिकोच्या संसदेत आणण्यात आले आणि अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन ते एलियनचे म्हणजेच परग्रहावरील मानवाचे असल्याचं सांगितलं गेलं. सुमारे दोन-तीन वर्षे वयाच्या मुलाइतकी उंची असलेले हे सांगाडे पूर्ण वाढ झालेल्या मानवसदृश जीवाचे आहेत आणि त्यांची शारीरिक घडण माणसासारखीच आहे. आपल्यासारखे दोन डोळे, नाक आणि तोंड असलेल्या या जीवांचे कान मात्र उघडपणे दिसत नाहीत.
2017 मध्येच हे सांगाडे दक्षिण अमेरिकेच्या पेरूमधील कुस्क भागातल्या एका खाणीत सापडल्याचा दावा केला गेलाय. जीवाश्म स्वरूपात सापडलेल्या या सांगाड्यांच्या हातापायाला आपल्यासारखी पाच बोटं नसून, फक्त तीनच बोटं आहेत. मानवाची या सांगाड्यांशी तुलना केल्यास रचनेत तीस टक्के तफावत आढळलीय. याच वर्षी पाच एलियन ममी म्हणजे मानवसदृश जीवाचे पाच सांगाडे सापडल्याचा दावा यूएफओलॉजिस्ट जॅमे मौसान यांनी केला होता.
आता संपूर्ण जगाने हे सांगाडे पाहिल्यामुळे परग्रहांवरील कथित मानवाचा शोध महत्त्वाच्या वळणावर पोहोचल्याचं सांगितलं जातंय. मुद्दा एवढाच, की हे जीव खरोखर परग्रहावरून आले होते, की इथेच असे जीव अस्तित्वात होते? मेक्सिकोच्या संसदेत या सांगाड्यांचं जाहीर प्रदर्शन झालं तेव्हा विमानातून कथित एलियन स्पेसक्राफ्ट पाहिलेला अमेरिकी पायलटही उपस्थित होता.
अमेरिकेकडे एलियन्सची माहिती असून, ती लपवून ठेवली जात असल्याचा दावा अमेरिकेच्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केला होता; परंतु पेन्टागॉनने असे सर्वच दावे फेटाळले होते. आता प्रदर्शित केलेले सांगाडे खरोखर परग्रहावरील मानवाचे असतील तरी आणि पृथ्वीवरच्याच एखाद्या लुप्त प्रजातीचे असतील तरी आपल्याच “बिरादरी’तल्या हजार वर्षांपूर्वीच्या जीवांची नव्यानं ओळख पटणार, हे निश्चित!