हिमांशू
निवडणुका असल्या की काही गोष्टी हमखास घडतात तशाच युद्ध सुरू झाल्यावरही काही गोष्टी हमखास घडतात. निवडणुकीच्या वेळी घडणाऱ्या गोष्टी आपल्याही सवयीच्या झालेल्या असतात. विकासकामांची उद्घाटनं आणि भूमिपूजनांचा धडाका सुरू होतो आणि त्याचबरोबर प्रतिपक्षाने काहीच कसं केलं नाही, सर्वकाही आम्हीच कसं केलं हे सांगण्याची अहमहमिका लागते. उद्घाटनं आणि भूमिपूजनं करण्याची संधी ज्यांना मिळत नाही, ती मंडळी रिबिनी कापणाऱ्यांना “पाच वर्षे काय केलं?’ असं विचारतात तर रिबिनी कापणारी मंडळी प्रतिपक्षाला “तुमच्या काळात काय झालं?’ वगैरे विचारतात. जाऊ दे! या साऱ्याचा मतदारांनाही आता वीट आलाय. या राजकारणाला किमान युद्धप्रसंगाचा अपवाद असावा, अशी अपेक्षा बाळगणं काही गैर नाही. परंतु केवळ आपल्याकडेच नव्हे तर अमेरिकेतसुद्धा तसंच घडतं हे पाहून मनाला थोडा दिलासा मिळाला.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणांवर टीका करून “मी असतो तर…’ वगैरे सुरू केलं तेव्हा एका दृष्टीनं बरं वाटलं. अमेरिकेच्या तुलनेत आपण खूपच मागासलेलो आहोत हा न्यूनगंड गेला. असो! तर, युद्धात आणि निवडणुकीत ज्या कॉमन गोष्टी असतात त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्योतिषी. जेव्हा दोन जण एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून गुरगुरू लागतात, तेव्हा हे ज्योतिषी कुंडल्या मांडतातच.
होतं काय, की निवडणुकीच्या वेळी राजकीय निरीक्षक आणि युद्धाच्या वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आपापल्या पोथ्या उघडून बसतात. त्रैराशिकं मांडली जातात; परंतु प्रत्येक वेळची परिस्थिती सारखी नसते आणि बऱ्याच ठिकाणी अंदाज चुकू शकतात. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांत क्रांती झाल्यामुळे या निरीक्षकांना आणि अभ्यासकांना हल्ली पूर्वीच्या तुलनेत खूपच काम मिळतं. कधी-कधी (किंबहुना प्रत्येक वेळी) दोन तज्ज्ञांच्या म्हणण्यात बरीच तफावत दिसते. कारण प्रत्येकजण परिस्थिती न सांगता “आपलं मत’ सांगू लागलेला असतो. या तज्ज्ञांचे अंदाज जेव्हा कोसळू लागतात किंवा लोकांना नीरस वाटू लागतात तेव्हा ज्योतिषांचा नंबर लागतो.
युद्धाच्या बाबतीत सामान्यतः महान दिवंगत ज्योतिषी काय सांगून गेले, याकडे लक्ष वेधलं जातं. अमेरिकेने सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखालील इराकवर हल्ला केला होता तेव्हा माध्यमांत नॉस्ट्रेडॅमसच्या भविष्यवाण्या अचानक चर्चेत आल्या होत्या. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाविषयी बाबा वेंगा नावाच्या अंध ज्योतिषाची आठवण सर्वांना अचानक झालीय. रशिया एकसंध असताना, म्हणजे 1979 मध्ये म्हणे या महिलेने थेट मंचावरून असं सांगितलं होतं की, रशिया आणि व्लादिमीर हेच अजिंक्य राहणार. आपल्या वाटेतले सगळे अडथळे दूर करून व्लादिमीर “जगाचा स्वामी’बनणार!
बल्गेरियाच्या रहिवासी असणाऱ्या बाबा वेंगा या फकीर होत्या आणि वयाच्या बाराव्या वर्षी अचानक डोळे गमावल्यानंतर त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली, असं सांगितलं जातं. “अपेक्षेप्रमाणेच’ त्यांनी आपली भविष्यवाणी लिहून न ठेवता आपल्या अनुयायांना सांगून ठेवली. टोळधाडी, अमेरिकेच्या अध्यक्षपदी कृष्णवर्णीय व्यक्तीची निवड आणि चेर्नोबिल दुर्घटनेपासून 9/11 च्या अमेरिकेवरील हल्ल्यापर्यंत त्यांची अनेक भाकितं खरी ठरलीत म्हणे! नाटोच्या ताज्या बैठकीत कदाचित त्यांनी केलेल्या भाकितावरच चर्चा झाली असावी!