पुणे- भर रस्त्यात पीएमपीची बस ब्रेकडाऊन होणे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडणे ही नागरिकांसाठी नवीन बाब नाही. मात्र, रविवारी (दि.6 मार्च) पीएमपीकडून ब्रेकडाऊन टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुस्थितीत बस मार्गावर आणण्याचे सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
शहरात पीएमपीच्या 1,400 बसेसद्वारे सेवा पुरवण्यात येते. मात्र, दररोज काही मार्गांवरच बसेस ब्रेकडाऊन होण्याच्या घटना घडतातच. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून, वाहनांच्या रांगा लागतात. मात्र, पीएमपी प्रशासनाकडून याकडे कानाडोळा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या दिवशी ब्रेकडाऊनच्या संदर्भात विशेष सूचना दिल्या आहेत. यांसह ठेकेदारांना देखील मार्गावर बसेस बंद पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याची तंबी प्रशासनाने दिली आहे. याबाबत आगारव्यवस्थापक आणि अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत. ब्रेकडाऊन विभागाने आगारांतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे, ब्रेकडाऊन झाल्यास तातडीने “अटेन्ड’ करण्याचे नियोजन करण्याची सूचना “ब्रेकडाऊन’ कंट्रोल रुमला दिली आहे.