मुंबई – अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. ज्याला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळाला होता. एका वेगळ्या भूमिकेत तो या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. मात्र दुसरीकडे धूम 4 हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत एका मुलाखतीमध्ये अभिषेकने भाष्य केले आहे.
अभिषेक बच्चन हा म्हणाला की, “धूम 4 चित्रपटाचे काम सुरू झाले असल्याची मला कोणतीही कल्पना नाही. समजा, धूम 4 चित्रपटाचे काम सुरू झाले असते तर मला नक्कीच आदित्य चोप्राने सांगितले असते.” पण सध्या अभिषेक अॅक्शन चित्रपट करण्याचा विचार करत आहे. दोन वर्षांपासून तो चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप बिझी असून अनेक चित्रपट रिलीज झाल्याचेही तो म्हणाला. सध्या अभिषेकचे चाहते धूम 4 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, घूमर हे स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहे. घूमरचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. बिग बींनी घूमरचे पोस्टर ट्विटरवर शेअर करत अभिषेक बच्चनच्या व्यक्तिरेखेचे उत्कृष्ट रूपांतर केल्याबद्दल कौतुक केले होते. यासोबतच त्यांनी घूमरसाठी मुलाला आशीर्वादही दिला. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत मुलाला भय्यू म्हटले आणि लिहिले, “भैयू.. घूमरसाठी माझे प्रेम आणि शुभेच्छा.. काही शॉट्स पहा आणि चित्रपटाच्या विषयानुसार तुम्ही पात्रांना कसे रुपांतरित केले आणि त्यानुसार बदलण्याची मागणी केली हे आश्चर्यकारक आहे. माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी असतील.. खूप प्रेम.” 18 ऑगस्ट रोजी ‘घुमर’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.