लोणंद -काळज (ता . फलटण) येथे पाळण्यात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बालकाचे मंगळवारी सायंकाळी अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरुन आलेल्या जोडप्याने बालकाचे अपहरण केल्याचा संशय असून लोणंद पोलीस शोध घेत आहेत. चार मुलींनंतर मुलगा झाला. त्याचेच अपहरण झाल्याने कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.
तरडगावजवळील काळज येथे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा अपहरणाचा प्रकार घडला. तेथील रामनगरमध्ये त्रिंबक दत्तात्रय भगत कुटुंबीयांसह राहतात. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. त्रिंबक भगत शेतीतील काम करत होते. झोपलेल्या बाळाला एका खोलीत पाळण्यात ठेवले होते. कुटुंबीय इतर कामात व्यस्त असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात डोकावून गेल्याचे मुलीने पाहिले. त्यानंतर काही वेळात काळा शर्ट घातलेल्या व्यक्तीने घरात शिरून बाळाला उचलले आणि तो पसार झाला. बाळाला घेऊन जात असताना त्रिंबक यांच्या मोठ्या मुलीने पाहिले. तिने आरडाओरडा केला.
परंतु, लोक गोळा होईपर्यंत संशयित पसार झाला. अपहरणकर्त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. 22 ते 25 वर्षांच्या काळा शर्ट व जीन्स घातलेल्या पुरुषाने व त्याच्यासोबत गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस घातलेल्या महिलेवर बालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघेही बाळ घेऊन दुचाकीवरून पसार झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. चार मुलींनंतर मुलगा झाला. त्याचेच अपहरण झाल्याने भगत कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करून तसेच सोशल मीडियाचा वापर करत तपास करण्याचा सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी संशयिताबद्दल माहिती मिळाल्यास लोणंद पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी केले आहे.