कॉर्पोरेट कंपन्यांची सहा खाती; खातेदारांची घेणार माहिती
बॅंक खात्याचा गोपनीय डेटा लीकप्रकरणी पाच पथके रवाना
पुणे – खासगी तसेच इतर बॅंकातील सक्रिय आणि निष्क्रिय खात्यांची गोपनीय माहिती चोरून 216 कोटी 39 लाख 34 हजार रुपये इतर खात्यांवर वळविण्याचा कट पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी हैदराबाद, औरंगाबाद, गुजरात, मुंबई, लातूर आदी पाच ठिकाणी पोलिसांची पथके तपासासाठी रवाना झाली. तपासात ही बॅंक खाती कॉर्पोरेट कंपन्यांची असल्याचे उघड झाले. या खातेदारांना पाचारण करून त्यांना या प्रकरणाची कल्पना देण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माशाळकर (रा. लातूर), मुकेश मोरे (येरवडा, पुणे), आत्माराम कदम (रा. मुलुंड, मुंबई), वरुण वर्मा (मेरठ, उत्तर प्रदेश) हे बॅंक खात्यांचे गोपनीय डेटा स्टोर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीत जॉब करत असल्याचे उघड झाले. माशाळकर आणि कदम
हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते वापी, सुरत आणि मुंबईवरून पुण्यात डाटा घेऊन आले होते. वर्मा यास सुरत येथे विकासचंद यादव (रा. सुरत, गुजरात) याने भेटून डाटा दिला.
पुण्यातील मुकेश मोरे आणि औरंगाबादमध्ये प्लॉटिंग व्यवसाय करणारा विशाल बेंद्रे हे मध्यस्थ होते. तर रोहन मंकणी आणि अनघा मोडक हे गोपनीय डाटा व पैसे घेऊन कोणत्या बॅंक खात्यावर भरायचे आणि वळवयाचे याचे काम पाहत होते. राजशेखर ममीडी हाही हैद्राबाद येथून काही बॅंक खात्याचा डाटा घेऊन पुण्यात आला होता. सुधीर भटवेरा आणि अनघा हे स्टॉक ब्रोकर म्हणून काम करत असत. त्यांचे लॉकडाऊनमध्ये व्यवसायात नुकसान झाल्याने ते या कटात सहभागी झाले.
बॅंक अधिकाऱ्यांचा गुन्ह्यात समावेश?
हा गुन्हा व्यापक स्वरुपाचा असून या गुन्हयात बॅंकेतून डाटा चोरणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहे तसेच अटक केलेल्या आरोपींकडे याबाबत चौकशी करण्यात येत आहे. डॉरमंट खात्याचा जप्त केलेला डेटा एकूण पाच बॅंक खात्यांचा असून त्या खात्यात दोन अब्ज 16 कोटी 39 लाख शिल्लक रक्कम आहे. आयसीआयसीआय बॅंकेतील हिट जेम्स खात्यावर संबंधित रक्कम वळवून पैसे काढले जाणार होते. रविंद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम, वरुन वर्मा यांचेकडे बॅंक खात्यांचे गोपनीय डेटा स्टोर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीत काम करतात. या गुन्हयात संबंधित बॅंकेचे किंवा बॅंकेच्या कामकाजाशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
राजेश शर्मा व परमजितसिंग संधू यांची कसून चौकशी
माशाळकर, ममीडी आणि बेंद्रे यांनी हैदराबाद येथील सोनू आणि वापीतील दीपकसिंग ऊर्फ अजय यांच्यासोबत या गुन्ह्याचा कट रचला. वेगवेगळया बॅंकेच्या सक्रिय आणि निष्क्रीय खात्यांची गोपनीय माहिती हॅक करून चोरली. त्याचा वापर करत या खात्यातील रक्कम परस्पर काढण्याचा कट रोहन मंकणी, आत्मराम कदम, वरुण वर्मा, विकासचंद यादव, सुधीर भटवेरा, राजेश शर्मा, परमजितसिंग संधू, अनघा मोडक यांच्या सहाय्याने रचला. हैदराबाद आणि गुजरात येथून दोन पथके या गुन्ह्यात काम करत होती आणि सांकेतिक भाषेत ते एकमेकांशी बोलणे करत होते.